‘उदयनराजे संध्याकाळी कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासले पाहिजे’, जयंत पाटलांची सणसणीत टीका

सातारा, 09 एप्रिल : ‘उदयनराजे भोसले हे संध्याकाळी बोलले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत, हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन’ असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उदयनराजेंवर जोरदार पलटवार केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावर साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्या घरावर जो प्रकार झाला ‘जे केलंय ते इथंच फेडावं लागेल’ अशी प्रतिक्रिया दिली होती त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी आज त्यांना सणसणीत असे उत्तर दिले.
‘उदयनराजे भोसले काय बोलतात याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. मुळात ते संध्याकाळी बोलले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत, हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन’ असे जयंत पाटील म्हणाले. पुढे ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना गेली 40 वर्ष वेळोवेळी मदत केली आहे, आधार दिला त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवार साहेबांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही. हे मुद्दामपणे आणि जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. जे तिथे आले ते एसटी कर्मचारी होते का, ते कोणत्या परिस्थितीत होते हे सत्य बाहेर येईल? अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगड फेक करत आंदोलन केलं . त्यानंतर गुणरत्न सदावर्ते याना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझ्या जिविताच काही बरं वाईट झालं तर पोलीस जबाबदार राहतील यावर पोलिसांकडे काही तरी कारण असतील त्यांनाअटक करण्याचे, त्याप्रमाणे कारवाई होईल. ही असली स्टंटबाजी बंद झाली पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.